श्री गुरुपौर्णिमा

(दिंडोरी प्रणीत उत्सव)

(आषाढ शु. १५) (दि. १६ जुलै २०१९)


                प्रत्येकास हे माहित आहे की, या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सान्निध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की, आपले गुरूपद साक्षात् परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा  घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ  महाराजांची षोडशोपचारे पूजा, अभिषेकासह सकाळी भूपाळी आरतीनंतर करावी त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे.

अकाल मृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं ।

श्री स्वामी समर्थ पादोदकं तीर्थ जठरे  

धारयाम्यहम्॥ शिरसां धारयाम्यहम॥

यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याने ११ माळी ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप व श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. आपले गुरू, सदगुरु, परमगुरू, परात्परगुरू व गुरूतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यासाठी जे स्वत:ला सेवेकरी म्हणून घेतात, त्यांनी वरील पध्दतीने गुरूपूजन करावे. हा गुरूपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे. त्यानंतर ठीक १०.३० वाजता नैवेद्य आरती करावी. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरू, माता, पिता, बंधु, सखा, सर्वस्व आहेत. या गोष्टींची जाणीव पदोपदी ठेवून तन, मन, वाणी व धनाद्वारे त्यांची सेवा करावी. भारतभर या दिवशी आपल्या गुरूची, आदरणीय व्यक्तीची किंवा आपल्या जन्मदात्या पित्याला गुरूस्थानी मानून पाद्यपूजा करण्याचा संकेत असून त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय करावयाचा असतो.

उपदेश मुख्यत :

     सत्य बोलावे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे. ‘श्री स्वामी समर्थ’ मंत्राचे व आपल्या धर्म संस्कृतीतील ग्रंथांचे, स्तोत्रांचे, गायत्री सारख्या दिव्य मंत्रांचे जप, वाचन, चिंतन, हवन थोडा वेळ तरी नियमित करावे आणि

मातृ देवो भव। पितृ देवो भव।

आचार्य देवो भव। अतिथी देवो भव।

स्त्री देवता भव। परस्त्री माते समान।

     हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा. या दिव्य भारतीय संस्कृतीच्या वारसाचा सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पाठपुरावा करून नवीन पिढीवर सुसंस्कार आज यशस्वीपणे केले जात आहेत.